कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी विजयी

२१ पैकी १७ जागा जिंकल्या  

Updated: Jan 7, 2022, 02:41 PM IST
कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी विजयी title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १७ जागा जिंकून सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं आपलं वर्चस्व कायम राखलं. खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन विकास विरोधी आघाडीला ३ तर एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या ६ जागा यापूर्वीच निवडून आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात राजर्षी शाहू विकास आघाडीनं ११ जागा जिंकून बाजी मारली आहे.

सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक हे सहा जण बिनविरोध म्हणून या आधीच निवडून आले आहेत. तर आज, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजू आवळे, आमदार विनय कोरे, सुधीर देसाई, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, भैया माने, स्मिता गवळी,, निवेदिता माने, श्रुतिका काटकर, विजयसिंह माने हे अकरा उमेदवार निवडून आले आहेत.   

तर खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन विकास विरोधी आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. स्वतः खासदार संजय मंडलिक यांच्यासह बाबासाहेब पाटील, प्राचार्य अर्जुन आबिटकर या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर, रणवीरसिंह गायकवाड हे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.