भल्याभल्या धनाढ्यांना आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्यात अडकवणाऱ्या हिंडनबर्ग कंपनीनं पुन्हा एकदा एक मोठा खुलासा केला आणि इथं भारतात एका क्षणात परिस्थितीनं गंभीर वळण घेतलं.
देशाच्या आर्थिक संस्थांपासून शेअर बाजारापर्यंत सर्वच ठिकाणी हिंडनबर्गच्या नव्या अहवालाचे परिणाम दिसून आहे. राहता राहिला मुद्दा, सर्वांची पोलखोल करणाऱ्या या हिंडनबर्ग कंपनीला नफा कुठून होतो याबाबतचा; तर ही माहितीसुद्धा आता समोर आली आहे.
हिंडनबर्ग रिसर्च ही कंपनी शॉर्ट सेलिंगच्या रुपात दणदणीत कमाई करते. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथं गुंतवणूकदार असे शेअर कर्जाऊ घेतात ज्यांची किंमत भविष्यात कोसळणं अपेक्षित असतं, जेव्हा ते शेअर विकले जातात.
शेअरची किंमत पडली की, ते त्यांची पुन्हा खरेदी करून कर्जाऊ शेअर देणाऱ्यांना ते विकतात आणि यातूनच नफा मिळवणं शक्य होतं. नफ्यासाठी हिंडनबर्ग संस्था याच रणनितीचा वापर करताना दिसते.
अहवालांच्या आधारे ही कंपनी अनेकदा बड्या संस्थांवर गंभीर आरोप लावते. यामध्ये आर्थिक गैरव्यवहारांमधील अनियमितता, फसवणूक अशा निकषांचा समावेश असतो.
सदर आरोपांनंतर स्वाभाविकच कंपन्यांचे शेअर कोसळतात. हिंडनबर्गनं मात्र तत्पूर्वीच या कंपनीच्या शेअरची शॉर्ट सेलिंग केल्यामुळं त्यांना दर गडगडल्यानंही फायदाच होतो.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हिंडनबर्गकडून सुरु असणारी शॉर्ट सेलिंग ही प्रक्रियासुद्धा वादग्रस्त बाबच आहे. कारण, शॉर्ट सेलर्सना त्यांच्या संशोधन आणि अहवालांच्या निष्पक्षतेसंदर्भातील प्रश्नांना सामोरं जावं लागतं.
जाणकार आणि टीकाकारांच्या मते हिंडनबर्गसारख्या अहवालांमार्फत शेअर बाजारातील दरांना प्रभावित करणं आणि शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून समाधानकारक नफा मिळवणं हा मुख्य हेतू साधला जातो.