तिलक वर्माला आशिया चषकाच्या संघात स्थान मिळलं असून याबद्दल त्याने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आशिया चषक 2023 च्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी (21 ऑगस्ट 2023 रोजी) निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी केली.
संघामधील सर्वात आश्चर्यचित करणारं नाव ठरलं तिलक वर्मा. तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केल्यानंतर त्याला लगेच संधी मिळाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना या 20 वर्षीय खेळाडूने 5 टी-20 सामन्यांमध्ये 172 धावा केल्या. याच खेळाच्या जोरावर त्याला आशिया चषकासाठी निवडलं गेलं.
भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना तिलक वर्माने, "मी स्वप्नातही विचार केला नव्हता की आशिया चषकासाठी मला निवडलं जाईल," असं म्हटलं आहे.
"भारतासाठी एकदिवसीय सामने आणि टी-20 संघात खेळण्याची संधी मिळेल. पण आशिया चषकामध्ये माझी निवड होणं हे मला एखाद्या स्वप्नाहून कमी नाही," असं तिलक वर्मा म्हणाला.
याच वर्षी मी टी-20 मध्ये पदार्पण केलं आणि काही कालावधीमध्ये माझं आशिया चषकासाठी सिलेक्शन झाल्याने मी फार समाधानी आहे, असं तिलक वर्माने सांगितलं.
रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव करताना तिलकने "रोहितने नेहमी मला पाठिंबा दिला. मी आयपीएलमध्ये आलो तेव्हा रोहितने मला पाठिंबा दिला," असं सांगितलं.
"आयपीएलमध्ये खेलताना त्याने मला प्रेशर घेण्याची गरज नाही. नेहमी खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न कर," असं सांगितल्याचंही तिलक वर्मा म्हणाला. तिलक हा मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळतो.
"तुला कधीही काहीही गरज लागली तर मला एक कॉल कर किंवा मेसेज कर मी नेहमी मदत करण्यासाठी हरज असेल," असंही रोहित शर्मा म्हणाल्याचं तिलकने सांगितलं.
मी घरगुती अंडर 19 स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे मला असा आत्मविश्वास वाटतोय की मी एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगला खेळ करु शकेन, असंही तिलक म्हणाला.