कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादवर 8 विकेट्स राखून विजय मिळवला.
आयपीएलच्या ट्रॉफीबरोबर केकेआरच्या संघाला 20 कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत.
मात्र केकेआरच्या या विजयाचा सर्वात मोठा फायदा झालेल्या व्यक्तींमध्ये एका अमेरिकी गायकाचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे हा गायक ना भारतात होता, ना मैदानात उपस्थित होता तरी त्याला साडेतीन कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आपण ज्या गायकाबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे, ड्रेक!
अनेक ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या ड्रेकला खेळासंदर्भातील वेगवेगळ्या घडामोडींवर मोठ्या रक्कमेची पैज लावण्याची सवय आहे. त्याने आयपीएलसाठी केकेआरच्या संघावर पैसे लावले होते.
पहिल्यांदाच क्रिकेटवर पैंज लावताना ड्रेकने तब्बल 2.5 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 2 कोटी 7 लाख रुपयांची पैंज लावली होती.
ड्रेकने आयपीएलच्या अंतिम सामन्याआधीच आपण केकेआरवर एवढा पैसा लावल्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
ड्रेकने जेवढे पैसे लावले होते त्याला 1.70 च्या हिशोबाने 3.52 कोटी रुपये केकेआर जिंकल्यास मिळणार हे सामन्याच्या निकालाआधीच स्पष्ट झालं होतं.
ड्रेकच्या चाहत्यांमध्ये अशी चर्चा असते की तो ज्या संघावर पैसे लावतो तो संघ सामान्यपणे अंतिम किंवा करो या मरोचा सामना हरतोच. मात्र यंदा असं झालं नाही.
केकेआरच्या संघाने ड्रेकसंदर्भातील हा भ्रम मोडून काढला आणि त्यालाही घसघशीत पैसा मिळवून दिला. अमेरिकेत बेटींग कायदेशीर असली तर भारतात बेटींगवर कायद्याने बंदी आहे.