बरेचदा पालकांवर पाल्याला ओरडण्याची वेळ येत असते. लहान मुलांना चांगल्या सवयी आणि शिस्त लावण्यासाठी, कधीतरी पालकांना कठोर शब्द वापरावे लागतात. मात्र लहान मुलांशी बोलताना भान सोडून चालत नाही. आपण कोणते शब्द वापरतो याचा विचार करणे फार गरजेचे आहे.
मुलांच्या कोवळ्या मनाला न दुखवता त्यांना चुकीची जाणीव करुन देणे, हे पालकांचे कर्तव्य आहे. रागाच्या भरात उच्चारली गेलेली तात्पूरती वाक्ये, मुलांवर कायमस्वरुपी परीणाम करु शकतात. सुधारण्याऐवाजी मुले पालकांपासून भावनिकरित्या दूर जातात. जे नात्यांसाठी हानिकारक आहे.
कामाच्या घाई-गडबडीत पाल्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. त्यांना वेळ देणे फार गरजेचे आहे. संवाद न झाल्याने पालक-मुलांमधील दुरावा वाढत जातो
लहान मुलांना बरेचदा पालक बोलू देत नाहीत. त्यांचे मुद्दे, त्यांची मते त्यांच्या वयाकडे बघून दुर्लक्षित केली जातात. यामुळे मुले व्यक्त होणं बंद करतात. नेहमी दुतर्फी संवाद साधा. पाल्याची बाजू त्याला मांडू द्या.
मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव करुन द्या. त्यांना लाज वाटेल किंवा अपराधी असल्यासारखे जाणवेल, हा हेतू न ठेवता त्यांना जाणीव करुन देणं एवढाचं हेतू ठेवा. प्रेमाने समजवायचा प्रयत्न करा. त्यांना घाबरवण्यापेक्षा मायेने समजवा.
पालकांची सर्वांत मोठी चूक म्हणजे आपल्या पाल्याची तुलना, दुसऱ्यांच्या पाल्याशी करणे. प्रत्येक मुलं हे वेगळं असतं. प्रत्येकाची आवड, कौशल्य समान नसून भिन्न असतात. तुलना केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. मुलं स्वतःला कमी लेखायला लागतात.
लहान मुलांना कधीच डीमोटिव्हेट करु नका. सतत प्रेरणा देत राहा. त्यांच्या लहान-लहान यशांचे कौतुक करा. त्यांना नैराश्य येईल अशी वक्तव्ये करु नका. मुलांना कायम पोषक वातावरणात ठेवा.
मुलांचे व्यक्तिमत्त्व याच कोवळ्या वयात घडत असते. त्यांच्यासाठी तुम्हीच त्यांचे आदर्श असता. पालकांचे मत पाल्यांसाठी फार महत्त्वाचे असते. एक चुकीचे विधान मुलांना तुमच्यापासून दूर करु शकते.