नव्या पोलीस आयुक्तांचे महत्त्वाचे आदेश

Feb 02,2024


राज्यातील अनेक शहरांमध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असले तरी पुण्यात ते बंधनकारक करण्यात आलेलं नसल्याचे म्हटलं जातं. पण प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे यासाठी वाहतूक पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करतात.


देशात दररोज सुमारे 411 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी जवळपास 80 टक्के दुचाकीस्वार, पादचारी आणि सायकलस्वार आहेत. हेल्मेट घातल्याने दुचाकी अपघातातून वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते.


मोटार वाहन कायद्यानुसार, 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मात्र पुण्यात अनेकदा या नियमांचे पालन होताना दिसत आहे. मात्र आता नव्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.


पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य असणार आहे. बाईकस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे असून, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.


पुण्यात यापूर्वी हेल्मेट सक्तीचे करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र प्रचंड विरोध आणि लोकांच्या असहकारामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, मात्र ज्याप्रकारे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे, ते पाहता हेल्मेट सक्तीचे करणे गरजेचे वाटते


भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजविणे, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग, तसेच सराइतांवर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून उपाययोजना करण्यात येणार आहे, असेही अमितेश कुमार म्हणाले.


याआधी गेल्यावर्षी 24 मे रोजी पुण्यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले होते.


मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार तसेच हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बाईक चालवणाऱ्या,तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story