आषाढी वारी सुरु झाली आहे. वारकरी आता पंढरपूरला रवाना होत आहे.
पण पंढरपूर या शब्दाची निर्मिती कशी झाली माहीत आहे का?
पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात.
पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विट्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो.
सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले आहे.
बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे.
इतिहासकार रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर वा पांडुरंगपूर यांपासून 'पंढरपूर' हा शब्दाची निर्मिती झाल्याच सांगतात.
'चौऱ्याऐंशीच्या शिलालेखा'त पंढरपुरास फागनिपूर व विठेबास विठ्ठल किंवा विठल म्हटले आहे.
1260 ते 1270 च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे.