बहुचर्चित 'निठारी हत्याकांड' प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.
अलाहाबाद हायकोर्टानं आरोपी सुरिंदर कोली आणि मोनिंदर सिंग पंधेर यांची फाशीची शिक्षा रद्द केली.
2006 मध्ये दिल्ली नजीकच्या नोएडामधील हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून टाकलं होतं.
निठारी हत्याकांड हे भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर सिरीअल किलींग खटल्यांपैकी एक मानले जाते.
या हत्याकांडाचा खुलासा पायल नावाच्या एका बेपत्ता मुलीमुळे झाला होता.
प्रकरणातील आरोपी सुरिंदर कोली हा पंधेर याच्या घरात नोकर होता. तो मुलींना काही ना काही आमिष दाखवून घरी आणत असे. निठारी गावातील बऱ्याच मुली बेपत्ता होऊ लागल्या होत्या.
29 डिसेंबर 2006 रोजी निठारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील D-5 या घराच्या मागील बाजूच्या नाल्यात बेपत्ता झालेल्या मुलांचे अवशेष पाहिल्याचा दावा निठारी गावातील दोन रहिवाशांनी केला होता.
मोनिंदर सिंग पंधेर आणि त्याच्याकडे घरकाम करणारा सुरिंदर कोली हे या प्रकरणातील संशयित होते.
सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, निवासी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष एस सी मिश्रा आणि इतर काही रहिवाशांनी टाकीच्या नाल्याचा शोध घेतला, तेव्हा कुजलेल्या अवस्थेतील हातांचे काही अवशेष त्यांना सापडले.
दोन्ही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी सुरिंदर कोलीने 20 वर्षीय पायलचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी टाकी आणखी खोदण्यास सुरुवात केली, तेव्हा तिथे अनेक मृतदेह आणि लहान मुलं-तरुणींचे कुजलेले अवयव आणि 19 मानवी कवट्या सापडल्याचं म्हटलं जातं.