भारतातील 'या' ठिकाणी चक्क गोठलेल्या नदीवर चालता येतं; चुकून बर्फाला तडा गेला तर....
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण, एक ठिकाण असंही आहे जिथं चक्क गोठलेल्या नदीवरून चालत ट्रेक करण्याचा थरार तुम्हाला अनुभवता येतो.
लडाखमध्ये असणारी झंस्कार नदी दरवर्षी हिवाळ्यामध्ये हळुहळू गोठू लागते आणि पुढे जाऊन ती इतकी जास्त प्रमाणात गोठते की तयार झालेल्या बर्फाळ पृष्ठाचा वापर येथील नागरिक समानाची ने- आण करण्यासाठी करतात.
याच नदीच्या पृष्ठावरून चालत चालत उणे 40 अंशांपर्यंतच्या तापमानात ट्रेकही करता येतो. जगभरात हा ट्रेक 'चादर ट्रेक' म्हणून ओळखला जातो.
हिवाळ्यात झंस्कार नदीवर तयार होणाऱ्या बर्फाच्या चादरीमुळं या ट्रेकला हे नाव मिळालं आहे. हा ट्रेक म्हणजे चालताबोलता धोका. चहुबाजूंना बर्फाच्छादित पर्वतरांगा, गोठलले धबधबे, जलप्रवाह आणि रक्त गोठवणारी थंडी हे असंच चित्र या ट्रेकमध्ये पाहायला मिळतं.
बरं हा ट्रेक करत असताना जिथंजिथं बर्फाची चादर टणक नसेल तिथंतिथं चालणं अतिशय धोक्याचं. 2018 पासून इथं येणाऱ्या पर्यटकांचा आकडा इतका वाढला की हा ट्रेकच बंद केला जातो की काय अशी भीती व्यक्त करण्यात आली.
चादर ट्रेकदरम्यान अनेकांनी जीवही गमावला. सध्या जागतिक तापमानवाढीचं प्रमाण पाहता येत्या काळात हा ट्रेक पूर्णपणे बंद केला गेल्यास आश्चर्य वाटायला नको. (सर्व छायाचित्र- trekthehimalayas.com)