लिव्हर खराब होईल म्हणून खूप दारु पिऊ नका असा सल्ला दिला जातो. दरम्यान कधीच दारु न प्यायलेल्या 38 टक्के भारतीयांना लिव्हरसंबंधीचा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिल्लीतील एम्सने केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
हा आजार फक्त प्रौढांपुरता मर्यादित नाही. तर 35 टक्के मुलांमध्येही याचा प्रभाव दिसतो. या अहवालात भारतातील गैर-अल्कोहलिक 'फॅटी लिव्हर' रोगावर विविध अहवालांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
हे अध्ययन रिपोर्ट जून, २०२२ मध्ये 'जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हेपेटोलॉजी' मध्ये प्रकाशित झाले. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे अनेकदा निदान होत नाही.
फास्ट फूडचे वाढलेले सेवन, निरोगी फळे आणि भाज्यांचे कमी सेवन आणि आरोग्यदायी नसलेला आहार, बैठी जीवनशैली हे याचे प्रमुख कारण असल्याचे पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अनूप सराया सांगतात.
'फॅटी लिव्हर'च्या उपचारासाठी सध्या कोणतेही मान्यताप्राप्त औषध नाही, परंतु हा आजार बरा होऊ शकतो. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे हा मार्ग असल्याचे ते सांगतात.
जीवघेण्या आजारापासून दूर राहण्याचा एकमेव उपाय म्हणजे दारूचे सेवन टाळणे. कारण कोणतीही दारू यकृतासाठी चांगली नसते.
क्षयरोगाच्या उपचारात वापरण्यात येणारी औषधे, अँटीबायोटिक्स, अँटीपिलेप्टिक औषधे आणि केमोथेरपी यकृतालाही नुकसान पोहोचवतात.