1950 आणि 1960 च्या दशकात रुपेरी पडद्यावरील सुपरस्टार देव आनंद हे तरुणींच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्यांची एक झलक पहायलाही चाहते आतुर व्हायचे.
आपल्या रोमँटिक चित्रपट आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले देव आनंद त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकेच रोमँटिक होते.
देव आनंद यांनी त्यांच्या आयुष्यात तीन महिलांवर खूप प्रेम केले. स्टारच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या नातेसंबंधांवर एक नजर.
असं म्हंटल जातं की, 40 च्या दशकात सिनेमांमध्ये एकत्र काम करत असताना सुरैय्या आणि देव आनंद एकमेकांच्या प्रेमात पडले. रिपोर्ट्सनुसार, ते सुरैय्याच्या प्रेमात तेव्हा पडले जेव्हा एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्यांनी तिला नदीतून बुडण्यापासून वाचवले आणि तिचा जीव वाचवण्याचे श्रेय तिने त्यांना दिले.
ते दोघे 'किनारे किनारे चले जाएंगे' या चित्रपटासाठी शूटिंग करत असताना ती बोटीतून पडली आणि तिला वाचवण्यासाठी त्यांनी तलावात उडी मारली.
सुरैयाच्या आजीने सुरुवातीपासूनच या नात्याला विरोध केला होता, कारण त्यांचा धर्म वेगळा होता. विरोधाला न जुमानता कलाकार भेटत राहिले आणि पळून जाण्याची योजनाही आखली. अखेरीस, आजीच्या दबावामुळे त्यांनी त्यांचे नाते तोडले. सुरैया वयाच्या ७४ व्या वर्षीही अखेरच्या श्वासापर्यंत अविवाहित राहिली.
सुरैय्यापासून विभक्त झाल्यानंतर काही काळानंतर देव आनंद दुसऱ्या को-स्टारच्या प्रेमात पडले. त्यांची 'बाझी' चित्रपटातील सहकलाकार कल्पना कार्तिक हिच्याशी त्यांचे नाव जोडले जाऊ लागले. 1954 मध्ये त्यांनी लग्न केले आणि त्याचसोबत त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी अपत्येही झाली.
नंतर देव आनंद 'हरे रामा हरे कृष्णा' या त्यांच्या चित्रपटात एकत्र काम करताना झीनत अमानच्या प्रेमात पडले. 'रोमान्सिंग विथ लाइफ' या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी असे लिहिले होते की , जेव्हाही आणि कुठेही तिच्याबद्दल प्रशंसेने बोलले गेले, तेव्हा मला ते खूप आवडले आणि जेव्हाही आणि कोठेही माझ्याबद्दल त्याच रीतीने चर्चा झाली तेव्हा ती आनंदी व्हायची.
झीनतला राज कपूर आवडायचे हे कळल्यावर मात्र त्यांनी तिला कधीच प्रेमाची कबुली दिली नाही. देव आनंदचे आत्मचरित्र लाँच झाल्यानंतर, झीनतने दावा केला की देव यांच्या मनातील या भावनांबद्दल त्यांना काही माहिती नव्हते .