T20 World Cup: पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची टी20 विश्वचषक स्पर्धेती दणक्यात झालेली सुरुवात पाहता हा संघ काहीतरी करिष्मा करुन दाखवेल अशीच अनेक क्रीडारसिकांना अपेक्षा होती. संघाचा आत्मविश्वास आणि खेळ पाहता या अपेक्षा वावग्या नव्हत्या. पण, अखेर पाकिस्तानच्या संघाला अपयशाचा सामना करावा लागला आणि गुरुवारी तर, हा संघ या स्पर्धेतूनच बाहेर पडला.
दुबईमध्य़े खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला 5 विकेटनं पराभूत केलं. निर्धारित 20 षटकांमध्ये पाकिस्ताननं 4 गडी गमावत 176 धावा केल्या.
पाकिस्ताननं दिलेलं हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं 5 गडी गमावत 1 षटक राखत पूर्ण केलं. ज्यानंतर पाकिस्तानी क्रीडारसिकांचा उत्साह मावळला आणि त्यांच्यामध्ये एकच निराशेचं वातावरण पाहायला मिळालं.
संघाच्या पदरात मोठा पराभव पडलेला असतानाच कर्णधार बाबर आजम यानं सामन्यातील त्या वळणावर लक्ष वेधलं जिथं ऑस्ट्रेलियाचं पारडं जड झालं.
अतिशय उत्साही आणि तितक्याच रोमांचक अशा या सामन्यामध्ये अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवणं शक्य झालं.
सामन्यादरम्यान, वेडनं मारलेला फटका झेल म्हणून टिपण हसन अलीला शक्य होतं. पण, त्यानं ही संधी गमावली. ज्याची किंमत पाकिस्तानच्या संघाला पराभवाच्या रुपात फेडावी लागली. अतिशय रंजक वळण्यावर सामना आलेला असतानाच झेल सोडणं संघाला महागात पडल्याचं बाबर आझमनं स्वीकारलं.
तिथे बाबरची ही कबुली पाहून पाकिस्तानात क्रीडारसिकांचा संताप अनावर होण्यासाठी, टीव्ही फुटण्यासाठीच चूक जबाबदार असल्याचं म्हणट नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले.
'सर्वकाही आमच्या रणनितीनुसार सुरु होतं. आमची धावसंख्याही चांगली होती. पण, गोलंदाजी फारशी चांगली सुरु नव्हती. अशाच वेळी तुम्ही झेल सोडाल तर सामना हातचा गेलाच. हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट होता.' असं आझम म्हणाला.
आतापर्यंत टी20 स्पर्धेत संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. यापुढे खेळाडू अशीच कामगिरी करत राहतील अशी आशा मी करतो. पुढच्या स्पर्धेपर्यंत आम्ही आमच्या चुकांमधून नक्कीच शिकू असं म्हणत बाबर आझमनं संघाला पाठिंबा देणाऱ्यांचा विश्वास जिंकला.