www.24taas.com, मुंबई
डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरु झाली. सकाळी ११च्या सुमारास डहाणू स्टेशनमधून ही लोकल चर्चगेटसाठी सुटली आणि तमाम पालघर-डहाणूवासियांनी आनंदोत्सव साजरा केला... ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर नव्या लोकलचं जंगी स्वागत करण्यात आलं...
भारतीय रेल्वेसाठी १६० वर्षपूर्तीच्या दिवशी डहाणूवासियांना गिफ्ट मिळालंय... गेल्या १७ वर्षापासून डहाणू आणि पालघरवासियांची प्रतीक्षा संपलीय... रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवताच डहाणूपासून चर्चगेटसाठी पहिली लोकल रवाना झाली... अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्यानं डहाणू आणि पालघरवासियांचा आनंद गगनात मावेनासा झालाय...
डहाणू स्टेशनमधून ट्रेन रवाना होताच सर्वच स्थानकात प्रवाशांनी या लोकलचं जंगी स्वागत केलं... उमरोळी स्थानकात डी.जे.च्या तालावर तर पालघरमध्ये बँड पथकावर नाचत उड्या मारत पहिल्या लोकलचं स्वागत केलं... तर सफाळेमध्ये तर लोकलच्या स्वागताचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला... इथं महिलांनी लेझीमच्या तालावर थिरकत नव्या लोकलचं स्वागत केलं...
चर्चगेट-डहाणू लोकलसेवा सुरु झाल्यानंतर आता त्याचं क्रेडिट घेण्यासाठी राजकीय नेते पुढं येऊ लागले. असं असलं तरी डहाणू-चर्चगेट लोकलच्या रुपात भारतीय रेल्वेकडून गिफ्ट मिळाल्यानं डहाणू-पालघरवासियांसाठी हा दिवस दिवाळी दसरा म्हटल्यास वावगं ठरु नये...