झी २४ तास वेब टीम, मुंबई
सीमाभागातील मराठी बांधवांनी कर्नाटकात योग्य मानसन्मान मिळत असेल तर कर्नाटकात जायला काय हरकत आहे, किंवा तो भाग कर्नाटकच्या अखत्यारित राहयला काय हरकत आहे असा सवाल एकिकरण समितीच्या शिष्टमंडळाला केला. कर्नाटकात जर मराठी बांधवांचा छळ होत असेल तर तो केवळ मराठी भाषक आहेत म्हणून होतो का काही वेगळं कारण आहे हे शोधावं लागेल असं ते म्हणाले. आपण लवकरचं यासंदर्भात भाजप नेते नितीन गडकरी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे राज यांनी सांगितलं. सुप्रिम कोर्टात सीमाप्रश्नावर चालू असलेल्या खटल्याबाबत महाराष्ट्राकडून जो वकील राज्याची बाजू मांडताहेत त्यांना बदलावेत अशी मागणीही राज यांनी केली.. याबाबत मनसे या मुदद्यावर लढण्यासाठी वकील देईल असं राज यांनी म्हटलं.
तर राज ठाकरे यांची भूमिका ही सीमावासियांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. हा राजकारणाचा मुद्दा नसून भावनिक असल्याचं राऊत यांनी म्हटलय. बेळगाव आणि सीमाभाग केंद्रशासित करावा, हाच या वादावर य़ोग्य तोडगा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सीमावादाबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेवर बेळगावमधल्या मराठी भाषकांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या व्यथांची जाणीव राज ठाकरेंना नाही, आमचा लढा मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि अन्य नेत्यांनी दिली आहे.
[jwplayer mediaid="15630"]