लहानपणी हरवलेला भाऊ भेटला `फेसबुक`मुळे!

लहानपणी घरातून निघून गेलेला एक मुलगा एका तपानंतर म्हणजेच तब्बल १२ वर्षांनी घरी परतला. अर्थात यात विशेष असं काही नाही. मात्र हे अनोखं मिलन घडून आलय फेसबुकच्या सहाय्यानं..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 31, 2013, 10:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
लहानपणी घरातून निघून गेलेला एक मुलगा एका तपानंतर म्हणजेच तब्बल १२ वर्षांनी घरी परतला. अर्थात यात विशेष असं काही नाही. मात्र हे अनोखं मिलन घडून आलय फेसबुकच्या सहाय्यानं...त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लहानपणीचा अंकुश आज तरुणपणीचा गुरबाजसिंघ बनून अवतरलाय...एखाद्या चित्रपटाला साजेशी ही सत्यकथा जितकी रंजक तितकीच भावनाप्रधान..
गुरबाजसिंगचं हे रूप त्याच्या कुटुंबियांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं आहे...कमरेला क्रीपान, डोक्यावर पगडी, वाढलेली दाढी...अशा अवस्थेत गुरबाज स्वत:च्या घरी परतलाय. आजचा हा गुरबाजसिंघ म्हणजे लहानपणीचा अंकुश आहे, यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही..अंकुश आणि संतोष हे दोघे भाऊ...दोघांमध्ये साधारण ३ वर्षांचं अंतर.. वडील वारलेले..दोघे आईसोबत हडपसर परिसरात राहत होते. अंकुश अंदाजे ११-१२ वर्षांचा असेल, मामाची मोटार सायकल त्यानं विहिरीच्या कठड्याला धडकवली..परिणाम म्हणून अपेक्षेप्रमाणे जे घडायचं ते घडलं.. त्याच रागात अंकुशनं घर सोडलं. एका ट्रक मध्ये बसून तो थेट नांदेडला पोचला...ट्रकवाल्यान त्याला एका बाबाजीच्या लंगरमध्ये सोडलं. याठिकाणी त्याचं संपूर्ण आयुष्यच पालटलं...या घटनेला आज सुमारे १२ वर्ष झाली... त्यानंतर आज, तेव्हाचा अंकुश हा गुरबाजसिंघ बनून घरी परतलाय. दरम्यानच्या काळात गुरबाजनं त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला..मात्र त्यासाठीचा पत्ता किंवा फोन नंबर नसल्यानं काही होऊ शकलं नाही... अशा परिस्थितीत सोशल नेट्वर्किंग त्याच्या कामी आलं.. फेसबुक च्या सहाय्यानं गुरबाजसिंघनं छोटा भाऊ संतोषचा शोध घेतला...कित्येक वर्षांपूर्वी दुरावलेल्या या बंधूंची बंधूभेट सुरवातीला फेसबुकवर झाली.. त्यानंतर फोनवर बोलणं झालं, आणि त्यानंतर लगेचच गुरबाजसिंघचं कुटुंबीयासोबत मिलन झालं...
गुरबाजसिंघ हाच आपला अंकुश आहे, हे ओळखणं त्याच्या कुटुंबियांसाठी खरोखरच कठीण होतं.. मात्र आईची माया काय असते याचा प्रत्यय याठिकाणी आला... गुरबाजला बघताच त्याच्या आईला तिच्या लेकराची ओळख पटली..गुरबाज सिक्ख सरदार बनलाय, यावर तिचा आक्षेप नाहीये.. घर सोडल्यानंतर तो वाईट लोकांच्या संपर्कात येउन चुकीच्या मार्गाला लागला नाही, यातच तिला धन्यता आहे..हरवलेलं मुल परत मिळाल्याचा आनंद तर तिला आहेच...
गुरबाजसिंघ आता तरुण आहे.. त्याला पुढील आयुष्य आईच्या मर्जीनं आणि लंगरमधील बाबाजीच्या सल्ल्यानं जगायचय..आज मात्र त्याचे सगळे नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी सारेजण त्याच्या परत येण्याचा आनंद साजरा करत आहेत...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.