महिला आमदाराला मारहाण; पाच अटकेत

काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ आणि त्यांचा दुसरा पती जाकी जाकीर यांना मारहाण केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी पाच जणांना आज रविवार अटक केली.

Updated: Jul 1, 2012, 02:02 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

काँग्रेसच्या आमदार रुमी नाथ आणि त्यांचा दुसरा पती जाकी जाकीर यांना मारहाण केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी पाच जणांना आज रविवार अटक केली.

 

आसाममध्ये एका महिला आमदाराला जोरदार मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. रुमी नाथ असं मारहाण झालेल्या महिला आमदाराचं नाव आहे. एका हॉटलमध्ये अज्ञात लोकांनी त्यांना जबर मारहाण केलीय. रुमी नाथ यांचं पहिल लग्न झालं होतं, मात्र पहिल्या पतीला घटस्फोट न देताच दुसरं लग्न केल्यामुळं ही मारहाण झाल्याचं बोललं जातंय. सामाजिक संघटनांनी मात्र हे तालिबानी कृत्य असल्याचं म्हटलंय. तर आसामच्या डीजीपींनी मारहाण करणा-यांना अटक करण्यात येणार असल्याचं सांगितलंय.

 

रुमी सध्या गर्भवती आहेत. मारहाणीत त्या आणि जाकीर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मारहाण होत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना जमावाच्या तावडीतून सोडले होते. प्रथोमपचारानंतर या दोघांना बंदोबस्तात गुवाहाटीला रवाना करण्यात आले.

 

बराक खोऱ्यातील बोरखोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रुमी नाथ करतात. पहिल्या पतीला घटस्फोट न देताच त्यांनी जाकीरबरोबर विवाह केला आणि स्वतःच त्याची माहिती सगळ्यांना दिली. राकेश सिंह हे त्यांचे पहिले पती असून, त्यांना दोन वर्षांची एक मुलगीही आहे. आपली पत्नी एक महिन्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार राकेश यांनी पोलिसांकडे केली होती.

 

२००६ च्या विधानसभा निवडणुकीत रुमी नाथ भाजपतर्फे बोरखोला मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाल्या. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०११च्या निवडणुकीतही विजय मिळविला होता.