मुंबईकरांसाठी Good News! कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, प्रवाशांची 25 मिनिटे वाचणार

Panvel Karjat Railway Project: मुंबईकरांसाठी आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होत आहे. जाणून घ्या यामुळं प्रवाशांची किती मिनिटे वाचणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 1, 2024, 02:54 PM IST
 मुंबईकरांसाठी Good News! कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, प्रवाशांची 25 मिनिटे वाचणार title=
panvel karjat railway project work completion date route and timing

Panvel Karjat Railway Project: मुंबईकरांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा हिस्सा असलेल्या या प्रकल्पासाठी जवळपास 2,782 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत 67 टक्के पूर्ण झाले आहे. 

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास निगम (MRVC)कडे सोपवण्यात आले आहे. नवीन कॉरिडोरमुळं पनवेल आणि कर्जतच्या मध्ये फास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीचा कायापालट होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झाले असून वनक्षेत्रातील कामाला सुरुवात होणार आहे. 

या प्रकल्पासाठी 56.82 हेक्टर खासगी जमीन आणि 4.4 हेक्टर सरकारी जमीनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. वनभूमीसाठी काही परवानग्यांची गरज आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर वेगाने पुढील प्रकल्पाला अधिक गती येणार आहे. सध्या 20 लाख घन मीटर जमिनीवर भराव टाकण्यास सुरुवात झाली आहे. तर, या मार्गावर तीन बोगदे असून तिन्ही बोगद्यांचे खोदकामास सुरुवात झाली आहे. 

रेल्वेमार्गावर 47 पुल असून त्यातील 35 पुलांचे काम पूर्ण झाले आहे. रोड ओवर ब्रिज (ROBs) 4 रोब बनवण्यात आले असून मोहोपे आणि किरवलीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वेगाने काम सुरू आहे. पुणे एक्स्प्रेसवे अंडरपासचे काम पूर्ण झाले आहे. 

स्थानके कोणती असतील?

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर एकूण 5 स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, मोहापे,चौक आणि कर्जत स्थानकांत वेगाने काम सुरू आहे. प्लॅटफॉर्म, फुट ओव्हर ब्रिज आणि प्रशासकीय कार्यालयेसारख्या सुविधांवर काम प्रगतिपथावर सुरू आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा उद्देष हा नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील क्षेत्राला कर्जतपर्यंत जोडणे हा असून एमएमआरचा विस्तार करणे हा आहे. यामुळं मुंबई लोकलला एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. तसंच, पनवेल ते कर्जत दरम्यान असलेल्या परिसराचा विकास होण्यासही मदत मिळणार आहे. 

या प्रकल्पामुळं कर्जतहून थेट सीएसएमटी व्हाया पनवेल मार्गे जाता येणार आहे. कर्जतकडील प्रवाशांना पनवेलवरुन हार्बर मार्गाने मुंबई सीएसएमटी स्थानक गाठता येणार आहे. यामार्गामुळं प्रवाशांची 25 मिनिटांची बचत होणार आहे.