मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आघाडीचे पत्र न मिळाल्याने सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळे राज्यपालांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी अधिकृत निमंत्रणे दिले आहे. राष्ट्रवादीला उद्या रात्री ८.३० वाजण्याची वेळ दिली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता संघर्षात रंगत आली आहे.
शिवसेनेला संख्याबळ सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आज रात्री साडेआठ वाजता राज्यपालांनी राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांना राज्यपालांनी फोन केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनाच्या दिशेने रवाना झालेत. त्याआधी राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी मीडियाला सांगितले, आम्हाला बोलावले आहे. मात्र, कशासाठी ते काहीही माहिती नाही. आम्ही तिकडे चर्चेसाठी जात आहोत. नंतर बोलतो. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले, आता राज्यपाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आता आमचा मित्र पक्षाशी चर्चा करुन काय तो निर्णय घेतो, असे आम्ही राज्यपालांना सांगितले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, हा शिवेसनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आज सकाळपासून सुरु असलेल्या चर्चेनंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन करणार, असे सांगितले जात होते. शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाल्यावर यावर जणू शिक्कामोर्तबच झाल्याची भावना सर्वांमध्ये होती. मात्र, तब्बल पाऊणतासानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राजभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला.
Nawab Malik, Nationalist Congress Party: We will get the letter today and make a final decision by tomorrow after holding discussions with our ally Congress. #Maharashtra https://t.co/iXUL6JzJUf
— ANI (@ANI) November 11, 2019
सत्ता स्थापनेबाबत येत्या दोन दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रिपणे निर्णय घेईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. उद्या याबाबत मुंबईत पुन्हा चर्चा होईल सध्या आमचं काहीही ठरलेले नाही, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्या मुंबईत काँग्रेस नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर एक समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आम्ही सत्तास्थापनेसाठी वेळ वाढवून मागितली, मात्र राज्यपालांनी ती फेटाळली आहे. परंतु आमचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळलेला नाही, अशी माहिती शिवसेना युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे जरी राष्ट्रपती राजवट लागली तरी सत्ता स्थापनेसाठीचे संख्याबळ शिवसेनेकडे झाले तर ते पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा दावा करु शकतात, अशी चर्चा आहे.