"काही समाजाच्या योगदानाचे कौतुक करण्यात..."; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्यपालांनी मागितली माफी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. 

Updated: Aug 1, 2022, 08:04 PM IST
"काही समाजाच्या योगदानाचे कौतुक करण्यात..."; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्यपालांनी मागितली माफी title=
(फोटो सौजन्य - ANI)

Governor Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद उफाळून आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. 29 जुलै रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात काही समाजाच्या योगदानाचे कौतुक करण्यात माझ्याकडून काही चूक झाली, असे राज्यपाल यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

"29 जुलै रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात काही समाजाच्या योगदानाचे कौतुक करण्यात माझ्याकडून काही चूक झाली. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या विकासात प्रत्येकाचे विशेष योगदान आहे. विशेषत: संबंधित राज्याची उदारता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या उज्ज्वल परंपरेमुळे आज देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे," असे राज्यपालांनी म्हटले आहे.मा. राज्यपालांचे निवेदन pic.twitter.com/3pKWHYgPp8

"गेल्या तीन वर्षांत मला महाराष्ट्रातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा आदर वाढवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. पण वरील भाषणात माझ्याकडून चुकून काही चूक झाली असेल तर ही चूक महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा अवमान मानण्याची कल्पनाही करता येणार नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो," असे म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागितली आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

“कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही,” असे राज्यपालांनी म्हटलं होतं