पुणे : येथे होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला अखेर जागा मिळालीय. मुकुंदनगरमधल्या महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव १२ ते १६ डिसेंबरदरम्यान होणार आहे.
मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. गेली बत्तीस वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत असे. मात्र यंदा क्रीडा स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं मैदान देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून विनाअट मदत करण्याची तयारी दर्शवली.
गेली 32 वर्षे हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत असे. यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यामुळे जागेतील हा बदल करण्यात येत आहे. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. या सगळ्यांच्या भावनांचा आर्य संगीत प्रसारक मंडळ मनापासून स्वीकार करीत असल्याचे जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिाजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागाबदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले.