राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो; नारायण राणे - दीपक केसरकर यांनी दाखवला राजकीय चमत्कार

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.  शरद पवारांनी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश आले नव्हते. अखेर शिंदे गट आणि भाजप युतीमुळे राजकीय चमत्कार घडला आहे.  

वनिता कांबळे | Updated: Jun 6, 2023, 09:28 PM IST
राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो; नारायण राणे - दीपक केसरकर यांनी दाखवला राजकीय चमत्कार title=

Maharashtra Politics : राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो.  सिंधुदुर्गात असाच एक राजकीय चमत्कार पाहायला मिळाला. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करणारे भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी हा राजकीय चमत्कार दाखवला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे हे दोन नेते चक्क एकाच मंचावर एकत्र आले. या दोघांना एकत्र पाहून राजकीय वर्तुळात वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सिंधुदुर्गाच्या राजकारणात बदलाचे वारे

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात कधीकाळी या विस्तवही जात नव्हता. मात्र, आता बदलत्या राजकीय वातावरणात राणे-केसरकर युती झाल्याचं चित्र दिसत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासकामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले. सावंतवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तब्बल 110 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ झाला. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई सिंधुदुर्ग हायवे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

राणे-केसरकर यांचे मनोमिलन

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेपेक्षा लक्षवेधी ठरलं ते राणे-केसरकराचं मनोमिलन. कार्यक्रमस्थळी राणेंचं आगमन झालं तेव्हा केसरकरांनी त्यांना पुढं वाट करून दिली. आमदार नितेश राणे भूमिपूजन करत असताना, राणेंचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांना केसरकरांनी पुढं येण्याचा आग्रह केला. सिंधुदुर्गातल्या जनतेसाठी हे चित्र काहीसं धक्कादायक होतं. 

कट्टर विरोधक, सख्खे शेजारी 

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचं राजकीय वैर सगळ्यांनी पाहिल आहे.  राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा केसरकर राष्ट्रवादीत होते.  केसरकरांनी राणेविरोधी भूमिका घ्यायला सुरूवात केली. शरद पवारांनी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही.  केसरकर शिवसेनेत गेल्यानंतर दोघांमधला वाद आणखीच वाढला. केसरकर पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हा नियोजन बैठकांमध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष पराकोटीला पोहोचला होता.  त्यामुळंच सावंतवाडीत राणे-केसरकर एकत्र आले तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत.  भाजपात असलेले राणे आता केंद्रीय मंत्री आहेत, तर शिवसेना शिंदे गटात असलेले दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री आहेत. या दोघांमधली नवी युती सिंधुदुर्गाच्या विकासात भर घालेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.