सेल्फीचा नाद जीवावर बेतला, मालगाडीवर चढून सेल्फी घेताना 14 वर्षांचा मुलगा होरपळला

मालगाडीच्या छतावरून फोटो काढत असताना 25 हजार हायवोल्टेज तारेला चिकटला आणि...

अमर काणे | Updated: Sep 26, 2022, 06:04 PM IST
सेल्फीचा नाद जीवावर बेतला, मालगाडीवर चढून सेल्फी घेताना 14 वर्षांचा मुलगा होरपळला title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सेल्फी (Selfie) म्हणजे आताच्या तरुण पिढीचा जीव की प्राण. एका सेल्फीसाठी तरुण पिढी जीव धोक्यात घालते. अशीच एक दुर्देवी घटना नागपूरमध्ये (Nagpur) समोर आली आहे. मालगाडीवर (Goods Train) चढून सेल्फी घेण्याच्या नादात एका 14 वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का लागून तो होरपळला. मोहम्मद आलम असं या मुलाचं नाव असून वांजरा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद आलमवर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.

नेमकी घटना काय?
रविवारी मोहम्मद आलम हा आपल्या काही मित्रांसोबत वांजरा परिसरात उभा होता. या ठिकाणहून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर काही कारणास्तव मालगाडी थांबली. यावेळी मालगाडीच्या छतावर चढून सेल्फी काढण्याचा मोह मोहम्मद आलमला झाला. पण हे किती धोकादायक ठरु शकतं हे त्याला कळलं नाही. मालगाडीच्या छतावर चढून आलमने सेल्फी घेण्यासाठी हात वर केला. पण त्याचा हात रेल्वेलाईनच्या उच्च दाबाच्या वाहिनीला (High Voltage Wire) लागला. काही कळायच्या हातच मोठा भडका उडला आणि विजेच्या धक्क्याने तो लांब फेकला गेला. 

धक्कादायक म्हणजे आलम गंभीर जखमी झाल्याचं पाहून त्याची मदत करण्याऐवजी त्याच्याबरोबरच्या मित्रांनी भीतीने पळ काढला. मोठा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी गर्दी केली. आरपीएफचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. काही लोकांनी जखमी अवस्थेत असलेल्या आलमला तात्काळ नागपूरच्या शासकीय मेडीकल कॉलेज व रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. 

तरुण पिढीला सेल्फीचं व्यसन
सेल्फी काढून तो क्षण मोबाईल मध्ये कैद करणे आणि सोशल मीडियावर पोस्ट करणे, रिल्स बनवणे ही जणू स्पर्धाच आजच्या तरुणांमध्ये लागली आहेय. पण याच फोटोमुळे त्यांच्या फोटोवर हार चढवण्याची वेळ येऊ शकते याचंही भान तरुणांना उरलं नाहीए. मोहम्मद आलम यानेही नको ते धाडस दाखवत मालगाडीवर चढून सेल्फी घेताना सुरक्षेचं भान ठेवलं नाही. त्यामुळे विद्युत दाबाचा झटका लागल्याने गंभीर अवस्थेत रुगणालयात उपचार सुरू आहे.