मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर माथेरान देखील पर्यटनासाठी बंद होते. पण आता माथेरान पर्यटनासाठी सुरु झाले आहे. इतकंच नाही तर उद्यापासून माथेरानची राणी मिनिट्रेन देखील सुरु होणार आहे. 2 सप्टेंबरला माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक देखील आता माथेरानमध्ये येऊ लागले आहेत. पण अमन लॉज ते माथेरान हे दोन किलोमीटर अंतर पर्यटकांना पायी चालावे गालत होते. त्यामुळे आता उद्यापासून पर्यटकांची ही समस्या दूर होणार आहे. मिनिट्रेन सुरू करण्याबाबत पर्यटकांनी आग्रह केला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने मागणी केल्यानंतर ही मिनिट्रेन शटल सेवा पर्यटकांच्या सेवेसाठी बुधवार 4 नोव्हेंबर पासून धावणार आहे.
पर्यटकांनी मागणी केल्यानंतर येथील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनिट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. पण प्रशासनाने राज्य शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. राज्य सरकारने मिनिट्रेन सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्यानंतर आता तब्बल आठ महिन्यांनी माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन 3 द्वितीय श्रेणी, 1 प्रथम श्रेणी आणि 2 मालवाहू बोगीसह पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार आहे.
मिनिट्रेनचे वेळापत्रक:
माथेरान ते अमन लॉज : सकाळी 9:30 आणि सायंकाळी 4 वाजता
अमन लॉज ते माथेरान : सकाळी 9:55 आणि सायंकाळी 4:25