How Next CM Of Maharashtra Will Be Decided: महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने 288 पैकी 225 हून अधिक जागांवर आघाडी मिळवल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.असं असतानाच आता मुख्यमंत्री कोण होणार यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनी मुख्यमंत्री कधी ठरणार याबद्दलचं भाष्य केलं आहे.
भाजपा महायुतीच्या इतर पक्षांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? की अजूनही चर्चा बाकी आहे? असा सवाल विनोद तावडेंना 'आजतक'वरील मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. "आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची पत्रकार परिषद झाली असून आम्ही जनतेचे आभार मानले आहेत. मोदींच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रात महायुतीच सरकार बनणार आहे. सरकारचा प्रमुख नेता कोण असेल हे एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादांबरोबर भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत ठरवेल," असं विनोद तावडेंनी म्हटलं.
"प्रवीण दरेकरांनी सांगितलं की 2014 पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळाल्या आहेत. तर भाजपाचा मुख्यमंत्री झाल्यास फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, असं मला वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावाना लक्षात घेऊन भाजपाला मुख्यमंत्री आपलाच नेता केला पाहिजे असं वाटतं का?" असा प्रश्न तावडेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तावडेंनी, "कार्यकर्ता आपल्या भावना मांडतात. मला राष्ट्रीय महामंत्र्याला हे नक्की माहिती आहे की तिन्ही नेते आणि केंद्रीय नेते एकत्र बसून हा निर्णय घेतील," असं उत्तर दिलं.
234 जागा आल्यानंतरही बलिदान देणार का? की मुख्यमंत्री पद आता भाजपाचा नैसर्गिक अधिकार आहे का? असा सवाल तावडेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तावडेंनी, " याचं विश्लेषण केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीनंतरच करता येईल. मी शक्यतांवर बोलत नाही. मी फॅक्ट्सवर बोलतो. फॅक्ट हा आहे की केंद्रीय नेतृत्वाबरोबर बसून निर्णय घेतला जाईल," असं उत्तर दिलं. "तुम्हाला मिळालेलं मताधिक्य पाहता तुम्हाला 80 टक्क्यांहून अधिक जागा मिळाल्याचं दिसत आहे. स्ट्राइक रेटचा विचार केल्यास हा भाजपाचा विजय आहे," असं म्हणत प्रश्न विचारला असता तावडेंनी, "हा विजय भाजपाचा, राष्ट्रवादीचा, शिवसेना, आरपीआयचा आहे," अशी प्रतिक्रिया नोंदवली.
आता बैठका आणि पुढील वाटचाल कशी असणार? तुमचं संसदीय बोर्ड काही निर्णय घेणार का? त्यानंतर तीन पक्षांची बैठक होणार? नेमकं होणार काय? अमित शाहांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांची चर्चा केल्याची बातमी आहे, असं म्हणत विचारणा करण्यात आली. त्यावर तावडेंनी, "26 तारखेला नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे हे संविधानानुसार निश्चित आहे. आज भाजपाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये विजयाच्या जल्लोषासाठी सर्व नेते एकत्र येतील. त्यावेळी केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीवर चर्चा होईल. मला वाटतं त्याआधी आज रात्री किंवा उद्यापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करुन घेईल. त्यानंतर संसदीय समितीबरोबर चर्चा करुन इथे निरिक्षक 24 किंवा 25 ला येतील," असं तावडे म्हणाले.