Aditya Thackeray Slams Mahayuti: महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार? याचा निर्णय लागून एका आठवड्याहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र त्यानंतरही सत्तात स्थापन झालेली नाही, मुख्यमंत्री कोण होणार याची औपचारिक घोषणा झालेली नाही. यावरुनच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी बहुमत मिळवणाऱ्या सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही सरकार का स्थापन केलं जात नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. इतकेच नाही तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी जाण्याच्या वेळेवरुनही आदित्य ठाकरेंनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
"मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालेलं नाही. निकालाला एक आठवडा उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापन झालेलं नाही. हा केवळ (राज्याला हलक्यात घेत) महाराष्ट्राचा अपमान नाही तर त्यांच्या लाडक्या निवडणूक आयोगाने केलेल्या सहकार्याचाही अपमान आहे," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी, "नियम केवळ विरोधी पक्षांना लागू असतात असं वाटतंय. काही विशेष लोकांना नियम लागू नाहीत," असंही म्हटलं आहे.
"सरकार स्थापनेचा दावा न करता, राज्यपालांकडे बहुमत न सादर करता शपथविधीची तारीख जाहीर करण्यामधून अराजकता दिसून येते," असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. "या सर्वांदरम्यान चंद्रकलेनुसार (आमवस्येला) काळजीवाहू मुख्यमंत्री छोट्या सुट्टीवर निघून जातात. हे आपण यापूर्वीही पाहिलं आहे," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. "जे सरकार स्थापन करु शकतात त्यांच्या प्राधान्यक्रमावर महाराष्ट्र आहे असं वाटत नाही. ते सध्या दिल्ली दौऱ्यांचा आनंद घेताना दिसत आहेत," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
"राष्ट्रपती राजवट? आतापर्यंत ती लागू व्हायला हवी होती ना? विरोधकांकडे संख्याबळ असतं आणि निर्णय लांबत असता तर आतापर्यंत ती (राष्ट्रपती राजवट) लागू झाली नसती का?" असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. "असो निवडणूक आयोगाच्या सहकार्यामुळे जो कोणी शपथ घेईल त्याचं आमच्याकडून अभिनंदन," असा टोलाही पोस्टच्या शेवटी आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
To not be able to decide on a chief minister, and form government, for more than a week after result day, is not just an insult to Maharashtra (for taking our state so lightly) but also to the assistance provided by their dearest Election Commission.
It seems that rules only…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 1, 2024
दरम्यान, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना, आमच्याकडे बहुमत असतं तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असती असा टोला लगावला आहे. दुसरीकडे 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतील अशी माहिती भाजपाच्या गोटातून देण्यात आली आहे. मात्र फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.