'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. याला प्रतिउत्तर देताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्या प्रश्नाला टीकेला उत्तर देणे हे उचित नाही असं म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 4, 2024, 05:28 PM IST
'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : शिरूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पुन्हा एकत्र येईल का या चर्चेला पूर्ण विराम दिला. यासोबत अमोल कोल्हेच्या खासदारकीच्या राजीनाम्याबाबतही अजित पवार यांनी भाष्य केलं. यावर आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण आता तो बाबा काही दिवसांत राजीनामा द्यायचं म्हणत होता. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचा राजकारणाचा पिंड नाहीच. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो यात आमची ही चूक आहे अशी स्पष्टोक्ती देत अजित पवारांनी अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला होता. यावर अमोल कोल्हेंनी भाष्य केलं आहे.

"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर भाष्य केलं. ते मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी बोलणं उचित नाही. पण त्यांनी काही वैयक्तिक आक्षेप घेतले त्याला उत्तर देणे कमप्राप्त आहे. दादा म्हणाले की सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली. जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो. त्यांनी अनेक सेलिब्रिटींची उदाहरणे दिली. मला अजित पवारांच्या निदर्शनात एक गोष्ट आणून द्यायची आहे की, आपण ज्यांची उदाहरणे दिली त्यातील एका सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचे माझ्या पाहण्यात नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाने प्रश्न लोकसभेत मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये मला संसदरत्न पुरस्कार मिळाला. माझ्या राजीनाम्याचे ते वारंवार म्हणाले. पण जर राजीनामा द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत उपस्थित नव्हतो का, संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? प्रश्न मांडणे सोडून दिलं होतं का? जर आपण लेखाजोखा बघितला तर आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असेलल्या खासदारांच्या कामगिरीपेक्षाही माझी कामगिरी उजवी आहे," असे अमोल कोल्हे म्हणाले.

"असा उमेदवार देऊन आम्ही चूक केल्याचेही अजित पवार म्हणाले. मला वाटतं तुम्ही तुमच्या चुकीची कबुली देत आहात. शिवस्वराज्य यात्रेचे आपणचं कौतुक केलं. त्यामुळे भूमिका बदलली म्हणून ही भाषा बदलली आहे का? अजित पवार यांचे पहिले विधान हे शिरुर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत आहे. कारण दिल्लीत शिरुरमध्ये कोणीतरी सेलिब्रिटी उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सगळे इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत," असे देखील अमोल कोल्हे म्हणाले.

"खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा अलिखित संकेत मी कायम पाळला. पण जर तुम्ही वारंवार उल्लेख करत असाल तर नम्रपणे मी एकच प्रश्न विचारू इच्छितो की, जर असा उमेदवार देणे चूक होती तर मग दहा दहा वेळा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या असे निरोप पाठवण्याचे कारण काय?" असा सवाल देखील अमोल कोल्हे यांनी केला.