मराठवाड्यासाठी खुशखबर; जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

या परिसरातील अनेक भागांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Updated: Aug 15, 2019, 03:13 PM IST
मराठवाड्यासाठी खुशखबर; जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले title=

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत.  या धरणातून दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

सध्या जायकवाडी धरणात ९२ टक्के पाणीसाठा असून, डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून विसर्ग सुरू होता. 

गेल्यावर्षी जायकवाडी धरण केवळ ६० टक्केच भरले होते. एवढेच नव्हे तर गेल्या तीन वर्षांमध्ये जायकवाडीमधून एकदाही पाण्याचा विसर्ग करण्यात आला नव्हता. मात्र, यावेळी पावसाच्या कृपेमुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

हे पाणी आता बीडच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक भागांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणातही विदर्भ आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा मास्टरप्लॅन जाहीर केला. त्यानुसार कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात वळवण्यात येणार आहे. तर वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भापर्यंत आणण्यात येईल.