धक्कादायक! महिला वाहकाच्या हातातच तिकिट मशीनचा स्फोट, एसटी महामंडळ आतातरी दखल घेणार का?

तिकीट वेंडिंग मशीन कंपनी विरोधात वाहक महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल 

Updated: Aug 27, 2021, 05:37 PM IST
धक्कादायक! महिला वाहकाच्या हातातच तिकिट मशीनचा स्फोट, एसटी महामंडळ आतातरी दखल घेणार का?   title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदियात बस स्थनाकात एका महिला वाहकाच्या हातात असलेल्या तिकिट वेंडिंग मशीनचा विस्फोट होवून महिला वाहक गंभीर जखमी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी आगारातून आलेल्या एसटी बसमधील महिला वाहक कल्पना मेश्राम परतीच्या प्रवासासाठी ई टी आय एम मशीनमध्ये रूट बदल करीत असताना अचानक तिकीट मशिनमध्ये स्फोट झाला. या स्फोटात कल्पना मेश्राम यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी कल्पना मेश्राम यांनी गोंदियाच्या रामनगर पोलिस ठाण्यात मशीन पूरवणाऱ्या ट्रायमॅक्स या कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे.  

एसटी महामंडळात तिकिट वेंडिंग मशीनचा अनेक वाहकांना त्रास सहन करावा लागला आहे. मशीन मधून प्रिंट न निघणं, मशीन अचानक बंद पडणं, तर  कधी चुकीच्या तिकीट प्रिंट होणे अश्या अनेक तक्रारी वाहकांनी एसीट महामंडळाकड केल्या. पण याची कोणतीही दखल महामंडळाकडून घेण्यात आलेली नाही. मशीन आऊट डेटेड होऊनही बदलून दिलेल्या नाहीत, यातूनच हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. 

ट्रायमॅक्स कंपनीकडून या मशीन 2017 मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशीनची वॉरंटी पाच वर्ष होती. मात्र महामंळाने याच कंपनीला एका वर्षाकरिता मुदत वाढवून मागण्यात आली. वाहकांना या मशीन उघडण्याची परवागी नाही, मशीन मध्ये बिघाड झाल्यास त्याचा भुर्दंड वाहकांनाच बसतो. याबाबत ट्रायमॅक्स कंपनीच्या इंजिनिअरला विचारणा केली असता मशीन ओव्हरहिट झाल्याने असे प्रकार घडत असल्याचं सांगण्यात आलं.