Beed Road Accident : माजलगांव येथील भाजप नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाला. भाजप नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान घडली.
माजलगांव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवन जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (22) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून माजलगावकडे येत असताना गेवराईजवळ त्यांच्या गाडीने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विश्वजीत जगताप आणि मित्र आर्यन कंटुले हे काही कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. काम आटपून गावी माजलगावच्या दिशेने परतत असताना गेवराईजवळ बायपास रोडवर रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहनावरील विश्वजीत यांचा ताबा सुटला. त्यामुळे त्यांची कार टेम्पोवर जाऊन धडकली. या दुर्घटनेत विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला मोठा मार लागला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मित्र आर्यन कंटुले याने सीट बेल्ट लावलेला असल्याने त्याला सुदैवाने किरकोळ मार लागला.
विश्वजीत जगताप यांच्या पक्षात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे. मात्र या अपघातामुळे राजकीय क्षेत्रासह बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात अनेक राजकीय नेत्यांच्या गाड्यांना अपघात झाला आहे. आमदार बच्चू कडू, आमदार योगेश कदम, जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे हे कार अपघातात जखमी झालेत. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. तर परळी येथे धनंजय मुंडे यांच्या कारला तर अमरावती येथे बच्चू कडू यांना एका दुचाकीने ठोकर दिली. तीन आमदारांच्या अपघाताआधीही भरत गोगावले, जयकुमार गोरे या आमदारांच्या कारचा अपघात झाला होता. यात अपघातात ते थोडक्यात बचावले होते. मागील वर्षी विनायक मेटे यांचं रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालं होते.