‘मुंबईतील मराठा महामोर्चात २५ लाख आंदोलकांचा सहभाग’

आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरु असलेला मराठा महामोर्चा बुधवारी मुंबईत असणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून यामध्ये २५ लाखाहून अधिक आंदोलक असतील असा दावा मुंबई समन्वय समितीतर्फे करण्या आला आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 8, 2017, 09:20 PM IST
‘मुंबईतील मराठा महामोर्चात २५ लाख आंदोलकांचा सहभाग’ title=

मुंबई : आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरु असलेला मराठा महामोर्चा बुधवारी मुंबईत असणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून यामध्ये २५ लाखाहून अधिक आंदोलक असतील असा दावा मुंबई समन्वय समितीतर्फे करण्या आला आहे.

यासंबधीच्या नियोजनाबाबत मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. आतापर्यंत झालेल्या ५७ मूक मोर्चांप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल असेही सांगण्यात आले.  मूक स्वरूपाचा हा ऐतिहासिक महामोर्चा ठरेल असे समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

कसा असेल मार्ग ?

सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मराठा मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.

चेंबूरपासून वाहतुक वळविली

मुंबईतील भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.

यंत्रणा सज्ज

मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या अभूतपूर्व मोर्चाची कल्पना असल्याने मुंबईतील यंत्रणाही सज्ज असणार आहे. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.