प्रेयसीला टाकीत पुरलं अन्... ; नराधमाने आईसोबत जाऊन केली हरवल्याची तक्रार

UP Crime : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये अशा घटना पाहायला मिळत आहेत. मीरा रोडमध्ये 56 वर्षीय प्रियकराने आपल्या 36 वर्षीय प्रेयसीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 10, 2023, 01:20 PM IST
प्रेयसीला टाकीत पुरलं अन्... ; नराधमाने आईसोबत जाऊन केली हरवल्याची तक्रार title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशभरात प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. मुंबईजवळ असलेल्या मीरा रोडमध्ये (Mira Road) मनोज साने या नराधमाने त्याच्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मनोज साने याने सरस्वती वैद्यचे तुकडे करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे. ही घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्येही (UP Crime) एका प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपीने प्रेयसीचा मृतदेह टाकीत लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. यानंतर त्या टाकीवर प्लास्टर देखील केल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका महिलेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह बांधकाम सुरु असलेल्या घरातील टाकीत लपवला होता. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज केसर असे 35 वर्षीय महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातील टाकीत लपवून ठेवला होता. या प्रकरणी आरोपी आशिष कुमार गौतमला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने प्रेयसीची हत्या करुन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले आहे.

राज केसर चौधरी ही 24 मे रोजी संध्याकाळपासून बेपत्ता होती. आपण आशिषकडे जात असल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र मुलगी घरी परत न आल्याने नातेवाईकांनी तिला फोन केला, मात्र मोबाईल बंद होता. त्यानंतर राज केसरची आई व भाऊ अमित यांनी आशिषला फोन करून तिच्याबद्दल विचारले. मात्र मला याबद्दल काहीच माहिती नाही असे आशिषने सांगितले.

या सर्व प्रकारानंतर चारच दिवसांनी आशिषने लग्न केल्याने सगळ्यांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. राज केसलच्या कुटुंबियांनी पुन्हा आशिषकडे मुलीबाबत चौकशी केली. मात्र तो दिशाभूल करत राहिला. त्यानंतर आशिष स्वतः राज केसरच्या आईला घेऊन पोलिसात तक्रार करण्यासाठी गेली. त्यानंतर दोघांनीही राज केसर बेपत्ता झाल्याची तक्रार देखील नोंदवली. मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी तपास केला असता त्यांना राज केसरच्या मोबाईलच्या सीडीआरमधून काही पुरावे हाती लागले. पोलिसांनी आशिषची चौकशी केली असता आपणच राजची हत्या करून सेप्टिक टँकमध्ये लपवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आशिषच्या नवीन प्लॉटवर पोहोचून राज केसरचा मृतदेह सेप्टिक टँकमधून बाहेर काढला.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषने मृतदेहासोबत सेप्टिक टँकमध्ये माती आणि वाळूदेखील टाकली होती. यासोबत त्यानंतर सेप्टीक टॅंकवर प्लास्टर देखील केले होते. दुसरीकडे, आशिषने आपल्या बहिणीच्या पैशातून घर बांधले आणि बहिणीने लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने तिची हत्या केली असा आरोप राज केसरच्या भावाने केला आहे.