रुपयाची घसरण सुरुच, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी स्थिती

 सलग सातव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे एका डॉलरचं मूल्य ७२ रुपयांच्या घरात गेलंय. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी ही स्थिती आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 6, 2018, 10:49 PM IST
रुपयाची घसरण सुरुच, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी स्थिती title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल दरवाढीला जबाबदार असलेली रुपयाची घसरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. सलग सातव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे एका डॉलरचं मूल्य ७२ रुपयांच्या घरात गेलंय. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर चिंता उत्पन्न करणारी ही स्थिती आहे. 

आज दिवसभरात डॉलरचं मूल्य ७२ रुपये ११ पैशांपर्यंत घसरलं होतं. दिवसअखेर त्यात थोडी सुधारणा होत ७१ रुपये ९९ पैशांवर डॉलर बंद झाला असला तरी त्यात कालच्या तुलनेत २४ पैशांची घसरण बघायला मिळालीये. रुपयाच्या या सततच्या घसरणीमुळे देशाची महसुली तूट वाढण्याचा मोठा धोका उत्पन्न झालाय. 

दुसरीकडे गेल्या ५ सत्रांमध्ये सातत्यानं घसरणाऱ्या शेअर बाजारानं आज मोठी उसळी घेतली. घसरलेल्या दरांचा फायदा उचलत संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणुकदारांनी चांगली खरेदी केली. त्यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२४ पूर्णांक ५० अंशांच्या वाढीसह ३८ हजार २४३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ५९ पूर्णांक ९५ अंशांची वाढ नोंदवली गेली.