Love Story : समलैंगिक प्रेमात विश्वासघात झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मैत्रिणींमध्ये प्रेमसंबंध होते. दोघींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यातल्या एका मुलीने 12 लाख रुपये खर्च करुन लिंग परिवर्तन केलं. पण प्रेयसीने दुसऱ्या मुलाच्या प्रेमात मैत्रिणीला धोका दिला. या प्रकाराने संतप्त झालेल्या मैत्रिणीने थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले. पोलिसांनी त्या प्रेयसीला अटक करुन कोर्टात हजर केलं, सध्या तीला जामीन देण्यात आला असून पुढची सुनावणी 23 फेब्रुवारीला आहे.
काय आहे नेमकी घटना?
झांसीमधल्या खैलार परिसरातील ही घटना आहे. इथं राहणारी सना खान ही एका आरोग्य केंद्रात काम करते. जवळच्या प्रेमनगर परिसरात तीने घर भाड्याने घेतलं होतं. या घराच्या मालकाच्या सोनल नावाच्या मुलीसोबत सना खानची मैत्री झाली. हळुहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकसाथ जीवन-मरणाच्या शपथाही घेतल्या. पण ही गोष्ट सोनलच्या घरच्यांना कळली. त्यांनी सना खानला घर खाली करण्यास सांगितलं.
या गोष्टीवरुन सोनलने घरच्यांशी भांडण केलं आणि घर सोडत सनाबरोबर राहू लागली. सोनलच्या घरच्यांनी याची पोलीसात तक्रार केली. पण दोघीही सज्ञान असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यानंतर सना खान आणि सोनल लिव इन रिलेशनशिपमध्ये राहु लागल्या. दोघींनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. सोनलच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सना खाने लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीने दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ऑपरेशन करुन घेतलं आणि मुलीची मुलगा बनली. इतकंच नाही तर सना खानने आपलं नाव बदलून सोहेल खान असं ठेवलं
सना उर्फ सोहेल खानचं ऑपरेशन झाल्यानंतर शरीरात पूर्ण परिवर्तन व्हायला एक वर्ष गेलं. यादरम्यान सोनलला एका रुग्णालयात नोकरी मिळाली. पण इथे काम करणाऱ्या एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि सोनलने सना उर्फ सोहेल खानला भेटणं बंद केलं. सोहेलने सोनलला तिथली नोकरी सोडण्याचा हट्ट केला. पण सोनलने याला नकार दिला आणि तीने सना उर्फ सोहेल खानचं घरही सोडलं.
या प्रकारावरुन सोनल आणि सना उर्फ सोहेल खानमध्ये वाद वाढला. सनाने तिच्यामागे लग्नाचा हट्ट धरला, पण सोनल नकार देत असल्याने अखेर सना उर्फ सोहेलने कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने सोनलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले, पण दिलेल्या तारखेला सोनला कोर्टात हजर राहिली नाही. अखेर तिला अटक करण्यात आलं आणि कोर्टात हजर केलं. कोर्टात सोनलला जामीन मिळाला, आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 23 फेब्रुवारीला होणार आहे.