LPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार

LPG cylinder price : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये पार पडलेल्या विधासभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच वाढले सिलिंडरचे दर... पाहा किती फरकानं वाढली किंमत   

सायली पाटील | Updated: Dec 1, 2023, 10:44 AM IST
LPG cylinder price : निवडणुका संपल्या गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार  title=
gas cylinder price hike before 5 states Assembly election results 2023

LPG cylinder price : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतातील राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोरममध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालही आता अवघ्या 48 तासांमध्ये म्हणजेच 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. त्यामुळं या घडामोडींना आणखी वेग आला आहे. या निकालांपूर्वी डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं आता या वाढलेल्या दराचा आर्थिक भार अनेकांनाच सोसावा लागणार आहे. 

प्राथमिक माहितीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढले असून आता ही किंमत 2000 रुपयांच्या फार जवळ पोहोचणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यानंतर घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात आतापर्यंत कोणताही बदल झाला नसल्यामुळं हे दर स्थित आहेत ही दिलासादायक बाब. 

हेसुद्धा वाचा : डिसेंबर महिन्यात बदलणार 'हे' नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार

 

नव्या महिन्यात लागू होणाऱ्या नव्या बदल आणि नियमांअंतर्गत देशातील चार महत्त्वाच्या शहरांमध्ये सिलेंडरच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये मात्र हे दर 21 रुपयांनी वाढले आहेत. ज्यामुळं मुंबईत 1728 रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरसाठी आता 1749 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकात्यामध्ये हे दर 22.5 रुपयांनी वाढले आहेत, तर चेन्नईमध्ये सिलेंडरच्या दरात 26.5 रुपयांची वाढ झाली आहे. 

घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ नाही... 

मागच्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्यामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सिलेंडरचे दर पाहायचे झाल्यास दिल्लीमध्ये 903 रुपये, कोलकाता येथे 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे. 

ऑगस्ट महिनाअखेरीस केंद्राच्या वतीनं घरगुती सिलेंडरचे दर 209 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून या दरांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. पण, येत्या काळात मात्र या दरांमध्ये बदल होऊ शकतात असं मत जाणकारांनी मांडलं आहे. आगामी निवडणुका आणि त्या धर्तीवर घेण्यात येणारे मोठे बदल पाहता राज्यात आणि देशात काही महत्त्वाच्या बदलांना नागरिक सामोरे जाऊ शकतात ही बाबही नाकारता येत नाही.