Video : रस्तातच कावड यात्रेकरुंना करत होता बिअरचे वाटप; पोलिसांनी घडवली अद्दल

Crime News :  महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांकडून कावड आणण्यात येत होती. त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे

Updated: Feb 18, 2023, 06:10 PM IST
Video : रस्तातच कावड यात्रेकरुंना करत होता बिअरचे वाटप; पोलिसांनी घडवली अद्दल title=

Crime News : महाशिवरात्री (Maha Shivratri) निमित्त उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलिगडमध्ये सध्या शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवभक्तांनी हरिद्वार, ऋषिकेश, गढमुक्तेश्वर आदी ठिकाणांहून कावड (kanwar yatra) आणण्यास सुरुवात केली आहे. रामघाट, अनुपशहर, राजघाट येथून गंगाजल आणून भगवान शंकराला जलाभिषेक करणार आहेत. अशातच अलीगड (Aligarh) येथील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कावड घेऊन जाणाऱ्यांना बिअर वाटप करताना दिसत आहे. काही लोक ते घेण्यास नकार देत आहेत तर काहीजण बिअरचे कॅन घेत आहेत. बिअर दिल्यानंतर ती व्यक्ती कावड घेऊन जाण्याऱ्यांच्या पाया पडत आहे. हा व्हिडीओ अलीगडमधील येथील असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे पोलिसांनी बिअरचे वाटप करणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून त्याची तुरुंगांत रवानगी केली आहे.

बिअरचे वाटप करणाऱ्या व्यक्तीचे नाव योगेश असल्याचे समोर आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त अलीगढमधील सलाम गार्ड रोडवरून जाणाऱ्या कावड यात्रेकरुंच्या मधोमध जात योगेश बिअरचे वाटप करत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला.  ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून अनेकांनी अलीगड पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी योगेशला अटक केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कावड यात्रेकरुंना बिअर वाटली जात आहे. कृपया याची तात्काळ दखल घ्या आणि कारवाई करा. तसेच ही सनातन संस्कृती तोडण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्यानंतर पोलिसांनी योगेश नावाच्या तरुणावर कारवाई केली आहे.

यानंतर पोलिसांनी योगेशविरुद्ध अबकारी कायद्याच्या कलम 60 (1) अन्वये अलिगडमधील क्वार्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिगडचे सीओ शिव प्रताप सिंह यांनी योगेशकडून एक मोटरसायकल आणि बिअरचे 14 कॅन जप्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच योगेशला अटक करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून योगेशला अटक केल्याने काही लोकांनी संताप व्यक्त केला आहे. योगेशला कोणत्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे, असा सवाल ट्विटरवर अनेकांनी केला आहे. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच तो बळजबरीने कोणालाही बिअरचे वाटप करत नाही अशी प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.