नवी दिल्ली : चीनमधून सुरु झालेला कोरोना व्हायरस आता झपाट्यानं जगभरात पसरू लागला असून १८६ देशांतील ३ लाखांवर लोकांना या आजाराची लागण झाली आहे. मृतांचा आकडाही झपाट्यानं वाढत असून ५ दिवसांत ५ हजारावर लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि झपाट्यानं वाढणारा मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.
पहिल्या ११० दिवसांत कोरोना बाधितांची संख्या १ लाख होती. पुढच्या १२ दिवसांत आणखी एक लाख कोरोनाबाधित वाढले. त्यानंतरच्या केवळ ३ दिवसांत आणखी १ लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं.
मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांत वेगानं वाढ झाली आहे. १८ फेब्रुवारीला २००० रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला होता. ९ मार्चला हा आकडा ४ हजारावर पोहचला. पण पुढच्या ८ दिवसांत ही संख्या दुप्पट म्हणजे ८ हजारावर पोहचली. तर त्यापुढच्या ५ दिवसांत आणखी ५ हजार रुग्णांचा मृत्यू होऊन आतापर्यंत मृतांचा आकडा १३ हजारांवर गेला.
गेल्या काही दिवसांत चीनमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या कमी झाली असली, तरी युरोप खंड, अमेरिकेसह अन्य देशांत कोरोनाचा फैलाव फारच वेगानं झाला. त्यात इटलीमध्ये दररोज शेकडो माणसं मृत्युमुखी पडल्यानं हाहाकार उडाला आहे.
चीनपाठोपाठ अमेरिका या महासत्तेलाही कोरोनानं ग्रासलं आहे. चीन आणि इटलीनंतर अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी असून तिथं २५ हजारावर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टनसह अनेक शहरांमध्ये लोकांना घरात कोंडून घेण्याची वेळ आली आहे. वॉशिंग्टनमध्ये ९४ तर न्यूयॉर्कमध्ये ७० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- जगभरात कोरोनाचा विळखा, ३ दिवसांत १ लाख रुग्ण वाढले, ३ हजार मृत्यू
- आतापर्यंत जगभरात ३ लाखांवर लोक कोरोनाबाधित, १३ हजारावर लोक मृत्युमुखी
- चीन, इटलीनंतर अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण, अमेरिकेत मृतांचा आकडा ३०० वर
- इटलीमध्ये एका दिवसात ७९३ बळी, मृतांचा आकडा ४८२५
- स्पेनमध्ये एका दिवसात २८५ बळी, मृतांचा आकडा १३७८
- इराणमध्ये एका दिवसात १२३ बळी, आतापर्यंत १५५६ बळी
- फ्रान्समध्ये एका दिवसात ११२ बळी, मृतांचा आकडा ५६२
- ब्रिटनमध्ये एका दिवसात ५६ बळी, आतापर्यंत २३३ मृत्यू
- स्विझर्लंडमध्ये एका दिवसात २४ बळी, मृतांचा आकडा ८० वर
- दक्षिण कोरियात आतापर्यंत १०२ बळी