मुंबई : तुम्ही चष्मा लावता? मग तुम्हाला कोरोना होण्याचा धोका कमी आहे. आता तुम्हाला हे वाचून हसू येईल...पण असं आम्ही नाही सांगत आहोत तर एका अभ्यासातून हे स्पष्ट झालं आहे.
कोरोनासंदर्भात अनेक अभ्यास आतापर्यंत करण्यात आले. यामध्ये केलेल्याच एका संशोधनानुसार असं समोर आलं आहे की, चष्मा वापरणाऱ्या व्यक्तींना इतर व्यक्तींच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.
या अभ्यासात म्हटल्याप्रमाणे, कोरोना व्हायरसचा विषाणू डोळ्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. हे संशोधन चीनच्या सुईझोउ भागात करण्यात आलं आहे.
या संशोधनात तज्ज्ञांनी 276 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश केला आहे. तज्ज्ञांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, चष्मा घालणाऱ्या व्यक्तींना कमी किंवा जास्त संसर्ग होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या संशोधनात असं आढळून आलं की, सामान्यपणे आपण नकळत अनेकवेळा डोळ्यांना स्पर्श करतो. डोळे हे आपल्या शरीराचा एक असा अवयव आहेत, जे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका डोळ्यांमार्फत जास्त आहे.
त्याच बरोबर, या संशोधनातून असंही समोर आलंय की, SARS-CoV-2 नाकाच्या माध्यमातून आणि अश्रूंद्वारेही आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीला देखील COVID-19 ची लागण होऊ शकते.
आकडेवारीनुसार, सध्याच्या परिस्थितीत 1 ते 12 टक्के कोरोना रुग्ण डोळ्यांमुळे संक्रमित झाल्याची माहिती आहे.
COVID-19 व्हायरस असलेल्या रूग्णांची चाचणी केल्यानंतर अश्रूंमध्येही हा व्हायरस आढळून आला आहे. यासोबतच डोळ्यांच्या तज्ज्ञांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, चष्मा घातल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकतो.