World Asthma Day: आज जागतिक अस्थमा दिन आहे. वायू प्रदूषणाचा दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांवर लक्षणीय परिणाम होतो. दमा हा केवळ प्रदूषणामुळेच उद्भवत नसला तरी हे एक प्रमुख कारण ठरु शकते.
प्रदुषकांमुळे होणारा त्रास: नवी मुंबईतील फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ शाहिद पटेल यांच्या सांगण्यानुसार, ट्रॅफिक एक्झॉस्ट, कारखाने आणि अगदी जंगलातील आगीद्वारे बाहेर पडणारे लहान कण आणि त्यातील वायू हे आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. हे प्रदूषक वायुमार्गांना त्रास देतात. त्यांची जळजळ करतात आणि त्यांना अतिसंवेदनशील बनवतात. या अतिसंवेदनशीलतेमुळे दम्याची लक्षणे वाढतात. छातीत घरघर, खोकला, दम लागणे आणि छातीत जडपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात.
धोका वाढतो: वायू प्रदूषण हे अस्तित्त्वात असलेल्या दम्यासाठी केवळ एक ट्रिगर नाही; हे त्याच्या विकासासाठी देखील कारणीभूत ठरु शकते, विशेषतः मुलांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. फुफ्फुसांच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यात वायु प्रदुषणाच्या संपर्कात आल्याने भविष्यात दम्याचा धोका वाढू शकतो.
ऍलर्जीस कारणीभूत : दमा आणि ऍलर्जी असलेल्यांसाठी, वायू प्रदूषण अधिक त्रासदायक ठरते. प्रदूषक वायुमार्ग संवेदनशील बनवितात, त्यामुळे ते परागकण किंवा डस्ट माइट्स सारख्या ऍलर्जीस अधिक संवेदनाक्षम बनवतात.
हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करा: तुमच्या क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेबाबत माहिती ठेवा. बातम्यांमधून किंवा इंटरनेटच्या आधारे तुम्हाला हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक पाहता येतील.
जास्त प्रदूषण कालावधीत घराबाहेर पडणे, व्यायाम करणे शक्यतो टाळा: प्रदूषणाची पातळी जास्त असताना घराबाहेर पडून व्यायाम करण्यापुर्वी विचार करा. नेहमी मास्कचा वापर करा. तुमचे इनहेलर सोबत बाळगायला घ्यायला विसरू नका.
तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा: वायुप्रदूषण आणि दम्याला कारणीभूत असलेल्या तुमच्या चिंतांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गरज भासल्यास ते तुमच्या दम्याची औषधे बदलु शकतात.
एक्टिव्ह रहा - एक्टिव्ह जीवनशैली बाळगून तुम्ही तुमच्या दम्यावरील वायू प्रदूषणाचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी करू शकता. वेळोवेळी तपासणी करा आणि फुफ्फुसविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.