Shruti Sinha Lashes out on College Festival : टीवी मुंबईत सध्या विविध महाविद्यालयांमध्ये वार्षिक महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवांमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अशाच एका महाविद्यालयात कपड्यांवरुन एका अभिनेत्रीला कार्यक्रम सोडून जावं लागलं आहे. टीव्ही शो 'स्प्लिट्सविला' आणि ओटीटीवर रिलीज झालेल्या 'कॅम्पस बीट्स' या वेब सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री श्रुती सिन्हा हिच्या बाबतीत हा सगळा प्रकार घडला आहे. श्रुती सिन्हा ही सध्या तिच्या अभिनयामुळे नाही तर तिच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. श्रुतीच्या ड्रेसमुळे तिला मुंबईतील कॉलेजमधून फेस्ट सोडावा लागला आहे. या सगळ्या प्रकारानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीने या प्रकाराबाबत माहिती दिली आहे.
अभिनेत्री श्रुती सिन्हा नुकतीच तिच्या नवीन शोच्या प्रमोशनसाठी मुंबईतील रामनारायण रुईला कॉलेजच्या उत्सव फेस्टिवलमध्ये पोहोचली होती. कॉलेजच्या नियमांनुसार प्रत्येकासाठी ड्रेसकोड निश्चित करण्यात आला होता. मात्र यावेळी अभिनेत्री श्रुती सिन्हाचे कपडे हे कॉलेजच्या ड्रेसकोडनुसार नव्हते. त्यामुळे तिला या फेस्टमध्ये सहभागी होण्यास नकार देण्यात आला. श्रुतीच्या कपड्यांवरुन महाविद्यालयातील शिक्षक तिच्यावर चांगलेच संतापले होते. त्यानंतर श्रुतीनेसुद्धा मतावर ठाम राहत तिथून निघून जाणे योग्य ठरवलं.
माध्यमांच्या वृत्तानुसार, जेव्हा श्रुती सिन्हा कॉलेज फेस्टसाठी आली होती तेव्हा तिचे कपडे पाहून कॉलेजच्या एका शिक्षिकेला राग आला होता. शंतनू माहेश्वरीसोबत ती या फेस्टमध्ये पाहुणी म्हणून आली होती. या फेस्टिवलसाठी कॉलेजने आधीच लो-डीपनेक, रिप्ड जीन्स किंवा पॅंट, टँक/क्रॉप/ट्यूब टॉप आणि शॉर्ट्स यांसारखे कपडे घालून येण्यास बंदी घातली होती. अशातच श्रुती सिन्हाने घातलेले कपडे कॉलेज शिक्षकेला आवडले नाहीत. श्रुती सिन्हाला पाहून शिक्षिका अभिनेत्रीवर चिडल्या होत्या.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर अभिनेत्री श्रुती सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या सगळ्या प्रकाराची माहिती दिली. श्रुती सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत याबाबत भाष्य केले. 'मी एका कॉलेज इव्हेंटमध्ये गेले होते, जिथे मला उद्धटपणे व्यवस्थित कपडे घालण्यास सांगण्यात आले. कारण त्या लोकांच्या मते माझे कपडे नीट नव्हते. अशा परिस्थितीत मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला,' असे श्रुती सिन्हाने म्हटलं आहे.
श्रुतीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहे. काही युजर्सने कॉलेजच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर काहींनी अभिनेत्री श्रुती सिन्हाची बाजू घेतली आहे. कॉलेजने जे केले ते योग्य केले असे एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने, 'तू कॉलेजमध्ये गेली होतीस, पबमध्ये नाही,' असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, योग्य केले, किमान कॉलेजमध्ये जाताना तरी योग्य रीतीने जायला हवं, असं म्हटलं आहे.
दुसरीकडे, श्रुतीसोबत कॉलेजमध्ये आलेल्या अभिनेता शंतनू माहेश्वरी याने देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. "रुईया कॉलेज इतके पुराणमतवादी असेल अशी अपेक्षा नव्हती. म्हणून आम्ही लिंगभेद सहन करू शकत नसल्यामुळे आम्ही तिथून जाण्याचा निर्णय घेतला. आपण देखील कार्यक्रमासाठी फाटलेली जीन्स घातली होती, परंतु त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही. आमच्यासोबत कोणताही ड्रेस कोड शेअर करण्यात आला नाही. विद्यार्थी परिषदेच्या शिक्षकांनी एका मुलीला 5 पुरुषांसमोर खाली खेचताना मला धक्का बसला. महाविद्यालयीन संस्थांमध्ये नियम तोडणे कोणालाच आवडत नाही. आणि कलाकार म्हणून आम्ही हे कोणापेक्षाही जास्त समजतो," असे शंतनूने म्हटलं आहे.
तसेच श्रुतीवर टीका होताच तिने देखील तिला मिळालेल्या पाठिंब्याचे फोटो इन्स्टावर टाकले आहेत. श्रुतीने रुईया कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की त्यांना या घटनेची लाज वाटली आणि जरी ते कॅम्पस बीट्स 2 च्या स्टार्सना भेटण्यास उत्सुक होते तरी श्रुतीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांना अभिमान आहे.